हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१३

अस्वस्थते

(वृत्त: कालगंगा)

होय दे तू संकटांचा भार दे अस्वस्थते
फक्त माझ्या निश्चयाला धार दे अस्वस्थते

मंदिरांपासून जाऊ दूर दोघे तू नि मी
आत्मविश्वासास मग आकार दे अस्वस्थते

सोडुया रणदुंदुभी अन् शंख, डंके राक्षसी
एकतारीतील साधी तार दे अस्वस्थते

जीर्ण आणिक जून साऱ्या चौकटी तोडू जरा
मोकळ्या वाऱ्यातला संचार दे अस्वस्थते

खेळल्या, रमल्या नि गेल्या खूप साऱ्या चंचला
एक सीतेसम जरा आधार दे अस्वस्थते

'पंडिता'ने सुज्ञतेचे खूप तुकडे वेचले
शेवटी संपूर्णतेचे सार दे अस्वस्थते


- निलेश पंडित
६ डिसेंबर २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा