हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१३

स्रोत

(वृत्त: अनलज्वाला)

व्यासंगाला वलयाची का नशा चढावी?
निःशब्दाला शब्दांची का गरज पडावी?

लीनतेतही सन्मानाची दडे अपेक्षा
कुटीलतेची सात्विकतेला लाभे दीक्षा

अनासक्त होण्याची साधूला आसक्ती
सत्ता पोटी बाळगून फोफावे भक्ती

स्वातंत्र्याच्या झेंड्याखाली वसे गुलामी
दगाबाज सेवक होतो स्वामींचा स्वामी

पदर पदर जगताचा आढळतो उफराटा
मऊ मुलायम हिरवळीतही लपतो काटा

कृष्ण धवल धाग्यांचा विणला कुणी पोत हा?
असे नव्हे ना … वैराग्याचा खरा स्रोत हा?


- निलेश पंडित
१३ डिसेंबर २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा