हा ब्लॉग शोधा

शनिवार, ७ डिसेंबर, २०१३

पुस्तक

(वृत्त: भूपती)

वाचणे नशीबी काही सहस्त्र पाने
वाचली त्यातली अनेक मी जोमाने
…. उरलेली संख्या ठाउक नाही कोणा
अज्ञात असे तोही लिहिली ही ज्याने


हे पुस्तक साधे … मला वाटतो ग्रंथ
द्रुत कधी भासते कधी वाटते संथ
…. उत्कंठेने मज करते व्याकुळ केव्हां
सोडते कधी मज करण्या फक्त रवंथ

रंगीत कधी तर कधी धवल अन् कृष्ण
त्यांतही असे संगती पूर्ण शीतोष्ण
…. रस भावकळांचे नऊ त्यांत पाझरती
वर भक्ती आणिक वत्सलता धारोष्ण

पण आता शब्दांपलिकडले मज दिसते
कोऱ्या पानीही दिव्य चेतना असते
…. रस, रंग, आकृत्या, शब्द न जेथे दिसती
तेथेच वाटते मूर्त शारदा वसते

कळले मज पुरते सार पुस्तकी नाही
जन्मा येती, विरती, नुरती संज्ञाही
…. ही क्रिया वाचनाचीच खरी बलशाली
जी दशा ठरविते … देते योग्य दिशाही


- निलेश पंडित
८ डिसेंबर २०१३

२ टिप्पण्या: