हा ब्लॉग शोधा

सोमवार, ३ मार्च, २०१४

कोडे

(वृत्त: वनहरिणी)

ह्या कोड्याला उत्तर नसणे ह्याचे कोडे पडले आहे
पण हट्टाशी स्वभावातल्या माझे घोडे अडले आहे

पडू देत पायांना भेगा … म्हणे तरी ना प्रवास घडतो
म्हणे सरुनही युगे घड्याळामधे एक ना ठोका पडतो
डोळ्यांवर ओढता झापडे ठेवा दृष्टीचा सापडतो
हास्यास्पद दावे हे ऐकत मन माझे अवघडले आहे
ह्या कोड्याला उत्तर नसणे ह्याचे कोडे पडले आहे

जेट युगाच्या गतीत मजला आनंदाची दिशा गवसली
युद्धे झाली होत राहिली तरी पायरी पुढची दिसली
लखलखीत बदलांनी लाखो पृथ्वी फसली अन मुसमुसली
वेदनेतही जगण्यावरती चित्त सदोदित जडले आहे
ह्या कोड्याला उत्तर नसणे ह्याचे कोडे पडले आहे

श्वासाश्वासाच्या पाऱ्याने आयुष्याचे बिंब धरावे
घोट घोट चव घेत मजेने विषामृताचे मिश्रण प्यावे
पाठ वळवता दिशेस एका नव्या दिशेने कवेत घ्यावे
ह्याचे उत्तर नसणे ह्यातच सूत्र सुखाचे दडले आहे 
वाटे आता सुटू नये जे कोडे ते सापडले आहे


- निलेश पंडित
४ मार्च २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा