हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १४ मार्च, २०१४

पूर्णत्व


(वृत्त: कलिंदनंदिनी)

समोर मार्ग दोन अन् परस्परांविरुद्ध ते
सदैव का अशा स्थितीत दैव हे स्थिरावते?

अनेक सूक्ष्म पायऱ्या स्थितीतल्या गतीतल्या
खुणावती मला हळूच दावतात वाकुल्या

कुठे प्रकाशदीप्त मार्ग कृष्णविवर अन् कुठे
इथे जुने सुके …. तिथे नवीन पालवी फुटे

सुरेख रंग, सूर, गंध यांत जीव गुंततो
अपार मोह जाणवून नित्य श्वास कोंडतो

अशी द्विधा मनःस्थिती कशी अखंड वागवू?
अनंतता नि रिक्तता - कुठे मनास गुंतवू?

परंतु एक जाणतो मनातल्या मनात मी
अपूर्णतेत याच मी खुलेन पूर्ण नेहमी


- निलेश पंडित
१४ मार्च २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा