हा ब्लॉग शोधा

सोमवार, १७ मार्च, २०१४

सरासरी

(वृत्त: वनहरिणी)

सरासरी सरसर सरसावे सरस काय तो न्याय कराया
सरासरीच्या अशा पडावे सूज्ञपणाने आपण पाया

पहिलेपण वेगळेपणाचे समर्थ ठरते हे विसरावे
गर्व धरावा चाकोरीचा निव्वळ धोपटमार्ग धरावे

सफरचंद डोक्यावर पडता खुशाल आधी खात सुटावे
केवळ खाली का पडले ते न्यूटनवरती सोडुन द्यावे

विकसित शास्त्रकलांसाठी ज्या मेहनतीची जोड लागते
अवघड त्या मार्गांशी आपण शांतपणे तोडावे नाते

नवयुगतेचा भास असावा मुक्तपणाची छबी असावी
पंडितजींची तान ऐकुनी आपणही वाहवा भरावी

वेष नवा पण नव्या युगाचे व्हावे आपण गणपत वाणी
'सरासरी'ने घरी आपल्या भरीत जावे सदैव पाणी


- निलेश पंडित
१८ मार्च २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा