हा ब्लॉग शोधा

बुधवार, १९ मार्च, २०१४

दोर

(वृत्त: कालगंगा)

शेवटी जो निश्चयाने नीटसा मी मापला
त्याच दोराने जिवाचा दोर माझ्या कापला

वायदे आत्मीयतेचे करत गेला जो कुणी
तो कधी नव्हताच अन् झालाच नाही आपला

आसवांनी गारवा जेव्हा दिला थोडा मला
खालती माती नि वरती सूर्य होता तापला

थोरवी मी काय वर्णू पूर्वजांची आपल्या
माणसे अस्पृश्य करुनी देव ज्यांनी स्थापला

चोख झाले भाग जेव्हा कामकाजाचे इथे
एक जेथे उजळला तेथेच दुसरा रापला


- निलेश पंडित
१९ मार्च २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा