हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २० मार्च, २०१४

उपेक्षित


देशोदेशींच्या भ्रमंतीत पाहिलेल्या
अठराविश्वे दारिद्र्य भोगणाऱ्या
डोळ्यांत आर्तता एकवटलेल्या
अगतिक, अडाणी, अजाण, उपेक्षित
दुर्दैवी जीवांवर बेतलेल्या
माझ्या चपखल कवितेला
अपेक्षित होता तो मिळालेला
राज्यपुरस्कार मी घेताना
कालच्या लखलखाटात
तिथे नसूनही
तू दिसलीस

डोळ्यांत - मनात
साचून राहिलीस
तशीच जशी साचली होतीस
तब्बल तीस वर्षांपूर्वी
खादीची साडी नेसून
गळ्यात शबनम आणि
सुवर्णाचा लेशही नसलेलं
काळ्या दोऱ्याचं
एक मणिमंगळसूत्र घालून
डोळ्यांभोवती काळी वर्तुळं
पण डोळ्यांत समाधान साठवून
आणि
नसलेलं पण मला भासलेलं
मृदू पण छद्मी स्मितहास्य
ओठांवर ठेवून
निरोप घेताना …
तुझी वाट पाहात असलेल्या
उपेक्षित समाजाकडे
जाण्यासाठी

तेव्हापासून पुन्हा
मी पडलोय संभ्रमात
नक्की .... कोण आहे कोण?


- निलेश पंडित
२० मार्च २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा