हा ब्लॉग शोधा

शनिवार, १९ एप्रिल, २०१४

विखार

(वृत्त: आनंदकंद)

हमखास रंगणारी नावे हजार झाली
नव्हतीस ज्यात तू ती मैफिल सुमार झाली

ओल्या दवांत न्हाली जी पाकळी फुलाची
माझ्या तुझ्या क्षणांची ती ही बहार झाली

कळण्यात वेळ गेला संवाद पापण्यांचा
मौनामधील भाषा नंतर विखार झाली

आश्वासने तुझी ती तसले तुझे बहाणे
नुसतीच भेटण्याची चर्चा चिकार झाली

स्वप्नांतही स्मृतींचे पडसाद पाहताना
डोळयांत भावनांची गर्दी अपार झाली

मागे वळून बघता दिसतेस आजही तू
माझीच स्मरणशक्ती हृदयास भार झाली

मुक्काम 'पंडिता'ला मिळणे अशक्य होते
आयुष्यभर भ्रमंती पण बेसुमार झाली



- निलेश पंडित 
२० एप्रिल २०१४

२ टिप्पण्या: