हा ब्लॉग शोधा

शनिवार, १० मे, २०१४

संहार


(Robert Frost यांच्या Fire and Ice या कवितेचा स्वैर भावानुवाद)

(वृत्त: भूपति)

मारेल जगाला कोण जगाच्या अंती
कोणात असावी ती संहारक शक्ती?
दग्धता असे इच्छांमध्ये दडलेली
इच्छा ईर्षेचा वडवानलही बनती

मज ज्ञात असे हा विध्वंसाचा स्त्रोत
ज्वाला - वणवा बनते साधीशी ज्योत
भरजरी रेशमी निर्मित जाते अवघा
अन् तीच करी मग नष्ट जगाचा पोत

हे मान्य परी ही शक्ती एकच नाही
नांदती तिच्यासम इतर भयंकर काही
इच्छेचा भस्मासूर खरेच विनाशी
पण विनाशकारी तितकीच अनिच्छाही

ती तिरस्कार अन् थंड रक्त उपजविते
चेतनाहीनता सुजाणांत भिनवीते
सावकाश रक्ताचा करते ती बर्फ
अन् जगास अवघ्या रसातळाला नेते


- निलेश पंडित
१० मे २०१४


Robert Frost यांची मूळ कविता:



Fire and Ice

Some say the world will end in fire,
Some say in ice.
From what I've tasted of desire
I hold with those who favor fire.
But if it had to perish twice,
I think I know enough of hate
To say that for destruction ice
Is also great
And would suffice.

Robert Frost

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा