हा ब्लॉग शोधा

सोमवार, २६ मे, २०१४

बदल

(वृत्त: हरिभगिनी)

जितके जावे पुढे पुढे तितकी दृष्टी वळते मागे
दोरखंड बनतात कधी होते जे नाजुकसे धागे

रक्तामधले मासे तळमळती पाण्याच्या ओढीने
त्या पाण्याच्या ... बालपणी जे नित्य प्यायलो गोडीने

लख्ख रुपेरी लखलख दिसली काळाच्या पानोपानी
प्रकाश हिरवाईत पाहता मी गेलो रानोरानी

नवी जशी वनराई होती तशी श्वापदे नवी नवी
जखमा पेलुन शिकार केली नशेत जगलो मायावी

बदल घडावा सतत घडावा या ध्यासाने मी घडलो
बदलाबदलाच्या पदरातच आज मला मी सापडलो

आज समजते बदलामध्ये एक सूत्र कायम होते
माझ्याशी माझेच अबाधित खोल झिरपलेले नाते

दोरखंड धाग्यांचे व्हावे रक्त बनावे पाण्याचे
ताना, सूर नि अनेक पलटे अखेर एका गाण्याचे

दृष्टीमध्ये पुढे नि मागे क्षितिज गवसते हे कळता
कवेत घेतो, ठाम रोवतो मीच मला मागे वळता


- निलेश पंडित
२६ मे २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा