हा ब्लॉग शोधा

रविवार, १ जून, २०१४

कवडसा

(वृत्त: कालगंगा)

पौर्णिमा ती ओळखे पाहून साधा कवडसा
काय सांगू मी तिला माझ्या मनाची लालसा

वाटतो ना एरवी मत्सर कुणाचाही मला
खाजगी मोठा तिचा तो मात्र सलतो आरसा

सोडते मागे न काही भेटते जाते घरी
मात्र छळतो रात्रभर माझ्या मनावरचा ठसा

टाळुनी गेलीस माझा प्रश्न साधा कालचा
मोगरा गजऱ्यातला बघ बोलला आता कसा

हासते नजरेतुनी ,मी बोलतो इतका जरी
बोलते नजरेतुनी अन् मी च होतो स्तब्धसा

काय ती आश्वासने देते जरी दररोज ती
वेळ ती ना पाळते अन् वाट मी बघतो असा

ठेवुनी विश्वास येते मोहरूनी जवळ ती
काय देऊ मी अशाने 'पंडिता'चा भरवसा

- निलेश पंडित
१ जून २०१४ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा