हा ब्लॉग शोधा

सोमवार, २ जून, २०१४

योजना

(वृत्त: कालगंगा)

संपल्या वाटा कशा आता विवेकाच्या इथे
रोज बाता बेरकी विकतात स्वप्नाच्या इथे

शब्द आणिक हासणे पाहून शंका वाटते
चालती खोट्या जणू मुद्रा सुवर्णाच्या इथे

गर्द वनराईत वृक्षांच्या मनोहर सावल्या
हालचाली त्यात दडती हिंस्त्र प्राण्याच्या इथे

स्पष्ट आणिक शुद्ध भाषा नम्र साधे वागणे
मात्र साऱ्या योजना केवळ बनावाच्या इथे

रोज सोयी नवनव्या वर संस्कृतीचे गोडवे
वेदना भरघोस माथी मात्र गरिबाच्या इथे

'पंडिता' मोघम जरासे बोलणे असते बरे
नेहमी हत्या नशीबी स्पष्टवक्त्याच्या इथे

- निलेश पंडित
२ जून २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा