हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १३ जून, २०१४

सूर

पाण्याबाहेरून आपुली जपून प्रतिमा बघू नका
सूर मारण्याचा क्षण येता मारण्यास डगमगू नका

दिसादिसाने फोल कशाला
बघत रहावे आयुष्याला
जीवन ही मरणांची माला
क्षणोक्षणी क्षण नवा जन्मला
साक्षी ना व्हा अनुभूती घ्या केवळ वरवर जगू नका
सूर मारण्याचा क्षण येता मारण्यास डगमगू नका

यशापयश फेरा नशिबाचा
एकत्रच डेरा दोघांचा
नित्य बदलणे धर्म जगाचा
प्रकाशासही स्पर्श तमाचा
अर्ध्या हळकुंडाने पिवळे अकारणच झगमगू नका
सूर मारण्याचा क्षण येता मारण्यास डगमगू नका

अव्यक्ताला व्यक्त करावे
नसतिल तेथे रंग भरावे
मनस्वितेचे सूत्र धरावे
मनात पण आपण न उरावे
विडा विवेकाचा उचला अन् गंड क्षुद्र बाळगू नका
सूर मारण्याचा क्षण येता मारण्यास डगमगू नका

- निलेश पंडित
१३ जून २०१४

२ टिप्पण्या: