हा ब्लॉग शोधा

बुधवार, २५ जून, २०१४

अर्थ

(वृत्त: कालगंगा)

दाखवे वरवर मला मी हासता ती त्रासते
मात्र नंतर लाजते लाजून थोडे हासते

सोसते माझा उन्हाळा हास्यवदनाने जरी
का कुणी म्हणतात माझी सावली ती भासते

ना कुणी विदुषी असे ती फक्त साधी सोज्वला
बोलल्याविण व्यक्त करणे मात्र जमवी खास ते

राग येतो, भांडते अन् शांत होते, विसरते
त्यात वर म्हणते मला 'झाले तुला आभास ते'

बोलते साधेच काही अर्थ भरुनी एवढा
'पंडिता'ची सर्व प्रतिभा फक्त आ मग वासते


- निलेश पंडित
२५ जून २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा