हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २६ जून, २०१४

समुद्र किनारी

(वृत्त: भूपति)

मी आलो तेव्हा जग अंधुकसे होते
पुळणीवर माया सुस्त धुक्याची होती
होड्याही साऱ्या होत्या नांगरलेल्या
चेहरे पुसटसे विरळच होते भवती

ती पहाटमाया उजाडता ओसरली
कण कण पुळणीचा प्रकाशात मग न्हाला
लखलखत्या लाखो लाटा लागत नाचू
तेजाने अवघा समुद्र ऊर्जित झाला

कोळ्यांची झाली गर्दी हलल्या होड्या
शोधीत निघाले मासे पोटासाठी
टोकाला दुसऱ्या वर्दळ पर्यटकांची ….
…मी अनुभवतो या कणाक्षणांच्या गाठी
……
……

ओंजळीत आता झरझरणारी वाळू
जी पायाखाली ही संतत झरझरते
भिजवून पाय लाटाही जाती मागे
पुढल्या लाटेची फक्त प्रतीक्षा उरते

दिन असाच सरला झरली बरीच वाळू
कित्येक पाहिल्या … आल्या गेल्या लाटा
मी अखेरीस राहिलो कोरडा आणिक …
परतीच्या उरल्या त्याच कोरड्या वाटा

पण आहे सूर्यास्ताची वेळ समीप
तमलांच्छित आता समुद्र मज भासेल
जाईन पुन्हा घरपरतीच्या वाटेने
स्वागतास माझे घरटे सज्ज असेल


- निलेश पंडित
२६ जून २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा