हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २७ जून, २०१४

वस्ती

(वृत्त: लवंगलता)

सतत वाढत्या वस्तीमधली नित्याचीच सकाळ
कडकड हाडांमधून वाजे घामट तेच गुऱ्हाळ
गालावर शेंबुड सुकलेला वर अश्रुंचे डाग
गोणपाट पत्र्यांना येते पुन्हा नव्याने जाग

मलमूत्राचे ओढे त्यातच पेपर, प्लास्टिक, पाणी
खडखड लोकल शेजारी शौचालय आणिक न्हाणी
नाल्यावर नाहतात पोरे, खरूजलेली कुत्री
भडक चेहरा पुसून झोपे कुणी जागुनी रात्री

भीक मागण्या कोणी, कचरा कुणी उपसण्या निघते
कुणास प्यारी पाकिटमारी कुणी खोपडी विकते
ह्या सर्वांचा दोष हाच की आले जन्माला हे
जबाबदारी जगण्याची अन् ज्याची त्याची आहे

लोक थोर जे देती ह्यांना परंपरेची ग्वाही
पुन्हा पुन्हा सांगती 'संस्कृती यासम दुसरी नाही'
धर्म, पंथ, जातींची येथे रुजवित जाती महती
अन् मग महिमा इतिहासाचा मिळून सारे गाती


- निलेश पंडित
२८ जून २०१४

२ टिप्पण्या:

  1. अत्यंत भेदक वास्तवावर तसाच कठोर प्रकाश सांडलेला ! हे सर्व कवितेतून मांडणे अवघड.पण अशक्य नसते ..

    उत्तर द्याहटवा