हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ६ जून, २०१४

धुनी

(वृत्त: सुमंदारमाला)

पुन्हा मी अकस्मात डोळे मिटावे जरा लुप्त व्हावे प्रकाशातुनी
मिळे लौकिकाने मला सर्व काही तरी का व्यथेची जळावी धुनी

जरी लाभले नित्य ऐश्वर्य सारे तरी स्थैर्य का त्यात ना भासते
जरी भोगले सौख्य साऱ्या तऱ्हांचे तरी वासना आ पुन्हा वासते

अतोनात कीर्ती मिळे तेधवा का मना ग्रासते सुप्त अस्वस्थता
बरे वाटते शोधणे का मनाला सुखेनैव एकांत अन् शांतता 

अपूर्णत्व डाचे मनाच्या तळाशी चमत्कार तेव्हा मना मोहवी
परी वेदना जाणता भाबड्यांची मनाला चिकित्सा गमे व्याजवी

स्थिरावे जरा डोलता डोलता अन् हलावे कुणी स्थैर्य देता मला
असा खेळ चाले - अखंडीत आहे दिशाहीनतेचा वसा लाभला

मिळे ते नकोसे हवे ते मिळेना असे सोसणे वाटते त्यागुनी ….
पुन्हा मी अकस्मात डोळे मिटावे जरा लुप्त व्हावे प्रकाशातुनी

- निलेश पंडित
६ जून २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा