हा ब्लॉग शोधा

शनिवार, ७ जून, २०१४

वापर

(वृत्त: शार्दूलविक्रीडित)

तेजस्वी, तगडा, बलाढ्य दिसतो नेता खरा शोभतो
वाचा स्पष्ट अचूक स्वच्छ असते, वक्ता गुणी भासतो
आवाजात सदैव जोर सकलां जोशात संबोधतो
धर्माचा जयघोष नित्य करुनी सिंहापरी गर्जतो

गाभा केवळ भावनीक असुनी चातुर्य नाही कमी
प्रश्नाला प्रतिप्रश्न नित्य करुनी जिंके सभा नेहमी
वक्तृत्वास तसे सदैव जपतो श्रोतृत्वही नेमके
वेळेला अपशब्दही उपजती जिव्हेवरी शेलके

निष्ठा चोख असे अमाप हृदयी जोपासलेली खरी
त्यागाची महती तशीच रुजुनी राही सदा अंतरी
नेतृत्वात निपूण नित्य सकलां ऐक्यात बांधीतसे
योजी कार्य सदैव चोख सगळे अंतासही नेतसे

कोणी सूज्ञ मनात मात्र म्हणतो, "प्राणी असे हा बरा …
… घाला दोर गळ्यात आणि पळवा - आहे तसा वापरा !"


- निलेश पंडित
८ जून २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा