हा ब्लॉग शोधा

शनिवार, ५ जुलै, २०१४

गर्व

(वृत्त: लवंगलता)

आज जरी निर्वासित काही बेघर असती काही
आपण सूज्ञ जनांनी द्यावी परंपरेची ग्वाही

"विश्वचि अपुले घर समजावे कुटुंब अवघी वसुधा"
ऐकवीत जा फूटपाथवर वसणा-यांना सुद्धा

कशास गप्पा भाकड स्त्रीशिक्षण अन् स्त्रीमुक्तीच्या
गोष्टी सांगाव्या तेजस्वी गार्गी मैत्रेयीच्या

आजकालच्या समाजातली जात खटकते ज्यांना
पुराणातल्या मूळ कल्पना पटवुन द्याव्या त्यांना

उपासमारी बेकारीची कुणी वाच्यता करती
सुवर्णकाळाची सांगावी तुम्ही अशांना महती

पाश्चात्त्यांच्या सभांमधे लावावी आपण वर्णी
दिपवावे गाऊन तयांना अभिमानाची गाणी

इतिहासाच्या पानांमधली नावे गिरवित जावे
सद्यकालच्या अवघड तपशीलास मात्र वगळावे

सतत असा गर्वाने अपुला भरून यावा ऊर
कृतकृत्य होऊन नित्य झोपावे डाराडूर


- निलेश पंडित
६ जुलै २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा