हा ब्लॉग शोधा

शनिवार, १६ ऑगस्ट, २०१४

बुरशी

(वृत्त: मंदाकिनी)

का ग्रासते, फोफावते भरलेपणाला पोकळी
अज्ञात अन् गूढासही आनंद का जातो बळी

ही कोणती बुरशी अशी स्थैर्यास ही जी लागते
पेरून भीती कायमी आयुष्य अवघे मागते

आंजारते, गोंजारते … मग वाढते अन् जाळते
देवत्व शोधायास नंतर हीनता चोखाळते

दुर्लक्षिते खडतर विवेकाची चिकित्सा नेहमी
निर्बुद्धतेशी जोडते सुख आणि शांतीची हमी

शरणागती ना मागता बुरशी कुणी काढेल का
अज्ञात अन् गूढासवेही स्थैर्य मग लाभेल का

- निलेश पंडित
१७ ऑगस्ट २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा