हा ब्लॉग शोधा

मंगळवार, १९ ऑगस्ट, २०१४

बेशक


आयुष्याच्या मध्यावरती दोन सख्या त्या पुन्हा भेटल्या
नष्ट कराव्या वर्षांच्या भिंती भेटीवाचुन बनलेल्या
ह्या हेतूने घेउन सारे अनुभव अपुले

गळाभेट घडली अन् झाले जुने क्षण नवे अवचित सारे
आठवले मग कुतूहलाचे ऐन यौवनातील निखारे
नकळत त्यातुन मादक नाजुक प्रश्न उमटले

ठामपणाने ही मग वदली, "एक सखा अन् दोन मुलांच्या ….
एक शहर - एकाच घराच्या मिती आखल्या संसाराच्या
सुखेनैव त्या साच्यामध्ये नित्य नांदते"

अंतर्मुख होउन मग वदली दुसरी तेव्हा, "विश्व हिंडले
कधी कधी मी एक रात्र अन् मित्र एक हे भोगत फिरले
तशी आजही मनाप्रमाणे नित्य वागते"

"नको पाश अन् स्थैर्य नको हे स्वैर राहणे बरे वाटते?"
"आवेगाच्या क्षणी नेमके खरेच स्वप्नी कोण दाटते?"
… आदळला प्रश्नावर अवघड प्रश्न अचानक

तटस्थ झाल्या, घुसमटल्याही क्षणभर दोघी मनोमनी मग
कृश देहांनी, विकल मनांनी क्षणात चाचपले सारे जग
… आणि जाणले राहुन गेले बरेच बेशक!


- निलेश पंडित
१९ ऑगस्ट २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा