तपे लोटली, बुचकळ्यात टाकते मला ही गूढ सावली वटवृक्षाची
सावलीत या किती जन्मली, किती वाढली प्रजा कीटकांची, पक्षांची
खोडावरती, फांद्यांवरती, पारंब्यांवर आली गेली कितीक घरटी
सावलीत ना केवळ प्राणी वसली रुजली अनंत झुडुपे छोटी खुरटी
त्यांत परंतू वाढत गेली प्रजा नेमकी विषवल्लींची सूक्ष्मरूपाने
आणि वाळवी पोखरणारी आयुष्याला जगता जगता कणाकणाने
काय निसर्गाची वृत्ती ही भव्यदिव्यतेतून सावली जन्मा यावी
त्याच सावलीमधे नेमकी तीच सावली नासवणारी प्रजा घडावी
मुळात बेचव जे जे ते ते आंबटतेतुन कठीणतेने मधूर व्हावे
आणि चालता वाट पुढे मग अगतिकतेने, दिशाहीनतेने नासावे!
- निलेश पंडित
१० ऑगस्ट २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा