हा ब्लॉग शोधा

शनिवार, २३ ऑगस्ट, २०१४

नशीब


नशीबास कंटाळणे टाळले मी
विरहवेदनेला घरी पाळले मी


जिथे चालणे संपणे शक्य नाही
असे मार्ग कित्येक चोखाळले मी

तुला वाटले संपला खेळ सारा
विसरलीस तू तेच सांभाळले मी

भले हास तू नाटकी निश्चयाने
तुझे मौन मौनात पडताळले मी

सुखाच्या पुन्हा चाहुली लागताना
जुनेदुःख का फक्त कवटाळले मी

जिथे मूल्य नाही खुळ्या भावनांना
तिथे दोन अश्रू उगा ढाळले मी

परतल्या जशा कालच्या सर्व लाटा
किनारे नवे आज धुंडाळले मी

गझल चार शब्दांत शेरांत नाही
अमर्याद दुःखास ही माळले मी

- निलेश पंडित
२४ ऑगस्ट २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा