हा ब्लॉग शोधा

रविवार, ३ ऑगस्ट, २०१४

जग

(वृत्त: लवंगलता)

अनेकदा मी भ्रमे ... गुंगवी अवचित मज ही माया
दोन धृवांचे दुवे जणू मन माझे, माझी काया

वलयांकित वादळवेडे जग पसरे अवतीभवती
कोलाहल, लखलख त्यामधली पाहुन डोळे दिपती

... आणि अंतरी संतत जागृत जग दुसरेही वसते
मोदाने रसरसते तसेच चिंतेने ठसठसते

हीच जगे ते धृव ज्यांचे आंपसात बळकट नाते
तेच कधी रूदन करते तर मोदात कधी गाते

असह्य होई द्विधा अवस्था मनी त्रस्तता वाढे
एकएक जग तयाकडे मज अलिप्ततेतुन ओढे

परी ज्ञात मज सोपे तेव्हा सूत्र जगाचे नव्हते
हीच त्रस्तता साहुन जगणे खुद्द एक जग होते

आता ना उरले धृव दोन्ही नसे त्रस्तता उरली
अंतर्यामी धृवताऱ्याची फक्त स्वस्थता मुरली

- निलेश पंडित
३ आॅगस्ट २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा