हा ब्लॉग शोधा

शनिवार, ६ सप्टेंबर, २०१४

नीरस


तीच
जी कोणे एके काळी
भूर्जपत्रांवर
भक्तीरसवाहक शब्दांमध्ये
बोरू टाकांतून पाझरून
थोड्याच काळात झाली शुष्क
पण टिकली युगानुयुगे
तर कधी जिने दिला जन्म
वीररसाला
चार काळ्या भिंतींमध्ये
साता समुद्रांपलीकडे
तर कधी दिली उभारी
जाहीर रौद्ररसाला
सरकारचे डोके फिरल्यावर ....
..... कधी सत्याग्रहात मनोबल वाढवणार्‍या
आईच्या वात्सल्याची केली
अजरामर नोंद
तर कधी दिले माध्यम
कारुण्याच्या अभिव्यक्तीसाठी
पूर्वेकडील विदारक युद्धाने
विषण्ण झालेल्‍या
कुसुमाग्रजांसारख्या महाकवीस

ती शाई
आज पाहिली
नखावर त्वचेवर विभागलेली
चार दिवसांत लुप्त होणार्‍या
ठिपक्यात
त्रस्त स्वप्नाळू मतदाराच्या बोटावर
नीरस झालेली


 - निलेश पंडित
६ सप्टेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा