हा ब्लॉग शोधा

शनिवार, ६ सप्टेंबर, २०१४

विस्तव

(वृत्त: लवंगलता)

कपाळ भिजलेले घामाने वर आठ्यांचे जाळे
लालबुंद चेहरा थरथरे वटारलेले डोळे
श्वासातून बरसती ज्वाला तप्त जिभेवर खेळे
सभा जणू भासते उग्रशा मधमाशांचे पोळे

थरथर कापत परजत जातो शब्दांची तो नांगी
हृदयाहृदयामधे पेरतो अग्नी जागोजागी
शब्दांतून पसरतो त्याच्या जणू लोळ आगीचा
अवघी होते सभा दग्ध बसताच डंख नांगीचा

उंचावे तो हात भासवी खड्गाचे ते पाते
विळ्याभोपळ्या समान भासे धर्मांमधले नाते
सभा संपते तसाच सोडुन विस्तव तो धगधगता
फक्त मारता एकच फुंकर वणवा बनण्याकरता

सचिव सांगतो नेत्याला गाडीतुन जाता जाता
"शोकसभा पुढची … डोळ्यांना ग्लिसरिन लावा आता"


- निलेश पंडित
७ सप्टेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा