हा ब्लॉग शोधा

शनिवार, १३ सप्टेंबर, २०१४

इतिहास


अभावातही नांदते समृद्धी
खुजेपणाही असतो विशाल
शून्यातही वसते अनंतता
आणि चेतनाहीनते इतकाच
अतिचेतनेतूनही जन्मतो
लकवा .... कधी कधी ....
ह्या जाणिवेतून जन्मला
मुक्तानंद
जेव्हा मनाच्या गाभ्यातून
प्रखर निश्चयानं
दार बंद करून
परतवलं
फारा वर्षांनी नकळत
माझ्या मनात जागा झालेल्या
कधी काळी भरजरी उंची
आता विटलेली
वस्त्रं सावरत
इतिहास नामक
अर्थहीन उपाधी लावून
अवतरलेल्या
सुरकुतलेल्या चेहर्‍याच्या
तेजोहीन भूतकाळाला


- निलेश पंडित
१४ सप्टेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा