कित्येक आयुष्यांच्या
शोभादर्शी
असंख्य लाल निळ्या
काळ्या करड्या
तुकड्यांतून
त्यांच्या नकळत
मला प्रश्न सतावतो
जशी एखाद्या छद्मी हास्यातून
तशीच एखाद्या निरागस मुलायमही ....
कुणाच्या सैलावल्यागत सुखासीन चेहऱ्यातून
तर कधी त्रस्त भयभीतही ....
अवचित कानावर पडणाऱ्या
नेमके साधर्म्य असलेल्या
कृतज्ञतेने भारलेल्या आवाजातून
तर कधी अपमानातून, दुर्दैवातून जन्मलेल्या
आकांतातून
कधी आत्मविश्वास
कधी उद्विग्नतेतून
पटते
माझ्या गतायुष्यातील
असंख्य तुकड्यातुकड्यांत
विखुरलेल्या माझी
मलाच ओळख
तशीच पटत असेल
माझ्या तुकड्यांमधून
स्वतःची ओळख कुणालाही ....
नेमकी कशाकशातून?
- निलेश पंडित
२१ सप्टेंबर २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा