हा ब्लॉग शोधा

बुधवार, ८ ऑक्टोबर, २०१४

चक्र

(वृत्त: लवंगलता)

वळून बघता मागे दिसते अवघड गूढ भ्रमंती
गूढ स्त्रोत गूढात वास अन् केवळ गूढच अंती

कडेकपाऱ्यांमधून झाला प्रवास खडतर सारा
कुबट कोपरे कधी तर कधी वारा स्वच्छ भरारा

संतत जंजाळात अनामिक अडकतसे जेव्हा मी
कुठेतरी करितसे प्रतिक्षा जागा एक रिकामी

दुरून दिसली जरी रिती ती तरी असे भरलेली
भिंती जमिनीवर कोळ्यांची जाळी अंथरलेली

तिथे ओढला जात असे मी अवघा मलीन होई
त्याच क्षणी घेऊन पालखी तुझी यायचे भोई

मला पालखी संकट भासे भोई तणाव भीती
जंजाळातुन सुटे पळे मी उबग दाटुनी चित्ती

पळताना जाणवे अचानक वारा स्वच्छ भरारा
तणाव भीती सरती आणिक उबग सरतसे सारा

रहस्य हे कळता चक्राचे सुखे विहरतो आता
नको पालखी नकोत भोई जंजाळात अडकता


- निलेश पंडित
८ ऑक्टोबर २०१४

२ टिप्पण्या: