हा ब्लॉग शोधा

शनिवार, २५ ऑक्टोबर, २०१४

कोष्टक


आयुष्याच्या आरंभाला
गर्भाशयी शून्य वसे
साऱ्या रंगांच्या अभावी
कृष्णरंगी तम दिसे

निरागस शैशवास
द्यावा तसा रंग जडे
दिल्या रंगाची स्वभावा
तारुण्यात बेडी पडे

काळ्या मातीतून कुठे
उगवते हिरवळ
कुठे नष्ट करी सृष्टी
माणसांची भुतावळ

रंगीबेरंगी धर्मांची
व्यर्थ उठाठेव फक्त
अल्पकाळ भक्तीभाव
एरवी सांडती रक्त

गौरवर्ण अर्भकाचा
पुढे उन्हात रापतो
काळासावळा पडत
जीव भीतीने कापतो

सर्व रंग मिसळून
अंती उरे कलेवर
समुच्चयाचे घालती
श्वेतवस्त्र तयावर

तुझ्या रंगीत सृष्टीचे
देवा चुकले कोष्टक
त्याचा तोडिसी का कणा
ज्याचे झुकते मस्तक?


- निलेश पंडित
२६ ऑक्टोबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा