हा ब्लॉग शोधा

मंगळवार, १६ डिसेंबर, २०१४

ठेवा


युगानुयुगं आपलं म्हणवणाऱ्या माणसांनी
सुखासाठी सदैव दुःख सोसत
अंधाराला प्रकाश मानत चाचपडत
मनं झिजवली कमी
थिजवली जास्त
हे जाणवून
दिशाहीन मनानं
धीरानं टाकलं एक पाउल
अज्ञानाच्या अंधारातच
प्रकाशाची निव्वळ तिरीप
दूरवर पाहात
डार्विनच्या उत्क्रांतीतत्वाच्या
कुबड्या घेऊन

तेव्हा गवसला
साडेतीन अब्ज वर्षांपूर्वीच्या
संभाव्य प्रथमपेशीचा
धुसर सूक्ष्म दुवा
अखिल स्थूल विराट जीवसृष्टीशी
निखळ अनुमानबद्ध नातं सांगणारा

सापडले
जीवसृष्टीच्या निरनिराळ्या घटकांना
एका मूलतत्वात गुंफणारे
मातीत विलीन झालेल्या
नामशेष मृतांच्या अवशेषांना
पुढील पिढ्यांसाठी न्याय देणारे
वैविध्यातून अखंड धावणारा
एकसमान धागा
पोटी बाळगणारे
असंख्य घटक

ज्यांनी मुक्तहस्ते आयुष्याला दिलं भरभरून बरंच काही  …
दिशाहीनतेत दडलेली दिशा
अज्ञानात लपलेलं ज्ञान
आणि
स्थूलसूक्ष्माच्या मूलतत्वाचं
शरणागतीविना स्वच्छ दिसणारं
श्रद्धेचा आधार न घेणारं
निकोप निर्मळ रूप


- निलेश पंडित
१६ डिसेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा