हा ब्लॉग शोधा

शनिवार, २० डिसेंबर, २०१४

मंत्र

(वृत्त: वनहरिणी)

मनात माझ्या सुप्त अपेक्षा चमत्कृतींची सदैव उरते
बालपणापासून नेहमी कुठेतरी कोपऱ्यात मुरते
संकटकाळी अथवा दिसता पुढ्यात माझ्या दुर्मिळ संधी
प्रार्थनेत, श्रद्धेत डुंबते तर्कशुद्धता अर्धी मुर्धी

मनुष्यत्व शापात नांदते अज्ञानाच्या भले नेहमी
आत्मविकासाची त्याला परि खुबी लाभली आहे नामी
ढाल खुबीची हातामध्ये अज्ञाताची हृदयी भीती
अशा दुहेरी तजवीजीने लढत जात जगण्याची नीती

दैव प्रयत्नाची समिकरणे ठरती अगम्य नित्य परंतू
हरेक किरणाला आशेच्या लगडे अंधाराचा किंतू
धडपडीत ह्या संतत आता गुपित स्पष्ट जाणवे आगळे
जुने जाउ द्या मरणालागुन मंतरलेले मंत्र वेगळे
…. …. मंतरलेले मंत्र वेगळे


- निलेश पंडित
२१ डिसेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा