हा ब्लॉग शोधा

शनिवार, ७ फेब्रुवारी, २०१५

वेगळा

(वृत्त: कालगंगा)

सर्व येथे सारखे कोणी न झाला वेगळा
आणि जो तो नेहमी समजे स्वताला वेगळा

माणसांसम माणसांचा झुंड अळणी वाटतो
धर्म, जातीने जरा होतो मसाला वेगळा

घात पृथ्वीवर तसा असतो निसर्गाचा तरी
माणसांचा माणसांवर त्यात घाला वेगळा

तोच नेता जो समाजाला करे एकत्र अन्
पेटवुन मग काढतो नाजुक क्षणाला वेगळा

रोज झुकता माणसे माणूस ज्यांना झुकवतो
देव स्थापावा कुणी येथे कशाला वेगळा

मागतो जो दान नंतर वाटतो लोकांत ते
तो धनाचा राखतो साठा उशाला वेगळा

- निलेश पंडित
८ फेब्रुवारी २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा