हा ब्लॉग शोधा

शनिवार, ७ फेब्रुवारी, २०१५

घडी

(वृत्त: पृथ्वी)

उठे प्रथम ती प्रभात समयी करे प्रार्थना
'मिळो सकळिकां अनंत सुमती' जपे भावना
लगोलग पुढे झटून करते स्वयंपाक ती
पदार्थ उरले स्वये ढकलते घशाखालती

जरा निजुन वा तशीच खपते दुपारी पुन्हा
स्वतास जपणे जणू समजते जगाशी गुन्हा
जुनेर शरिरावरी रुळतसे सदासर्वदा
कुपोषित जरा सदैव दिसते स्वये अन्नदा

मनात दडती तळात सगळ्या व्यथावेदना
प्रसन्न वदने जरी हसुनि ती सुखावी जना
दबून जगणे श्रमून मरणे अशी राहणी
जणू झगडणे अखंड झिजणे अशी बांधणी

पती म्हणतसे "महान गृहिणी मला लाभली"
म्हणे सुगृहिणी, "अशीच असु दे घडी चांगली!"


- निलेश पंडित
८ फेब्रुवारी २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा