हा ब्लॉग शोधा

सोमवार, ९ फेब्रुवारी, २०१५

साधारण


नुकताच मला भेटलाय
धादांत खोटं बोलणारा
सच्चा माणूस

माझ्याच वस्तीत राहून
बसमध्ये माझ्याबरोबर
रोज तिथेच जातो
जिथे करतो
काम तोही
बुजून दबून
मान खाली घालून
चारचौघांसारखा
आणि म्हणतोही
स्वतःला
सुशिक्षित साधारण
पांढरपेशा मध्यमवर्गीय
कॉमन मॅन

पण
जेव्हा वाट पाहताना
चुकलेल्या बसने उडवलेले
चिखलाच्या एकाच थारोळ्यातले
तसेच शिंतोडे
त्याच्या आणि माझ्या अंगावर
दिसतात
आणि तो हसतो
… फक्त हसतो -
स्वतःवर स्वतःशीच
तेव्हा मला तो वाटतो
आधार देणारा
असाधारण
खूप वेगळा



- निलेश पंडित
१० फेब्रुवारी २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा