हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २९ मे, २०१५

पोकळी

पोकळी जेवढी मोठी
घुमे तेवढा आवाज
आयते लाभते ज्यास
त्यास भला मोठा माज

विकल दरिद्री जो तो
पडतो सहज फशी
त्यात गरीबाची वाढे
बुजबुज वंशोवंशी

फळ नासता थोडेसे
जाते पुढेही नासत
पिकला मधुर गाभा
जाई नित्य आक्रसत

काणाडोळा करतात
जातिवंत आशावादी
भरून वाहता दु:खे
करती सुखांची यादी

माझा ईश्वर मनात
वाढतो नि फोफावतो
गातो अभंग आणि मी
झांजा टाळ वाजवतो

खेळ शरीरमनाचे
आनंदात मी खेळतो
शब्द फुलता विझता
फक्त कविता माळतो

- निलेश पंडित
२८ मे २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा