वापरावे नेट मोबाईलही हाती असावा
रोज नेटाने नवा व्हिडिओ बघावा पाठवावा
जोक थोडे आणि तत्वज्ञान फाॅर्वर्डीत जावे
काढुनी अंती गळा मग भूतकाळास्तव रडावे
पाठवावी आपली पुढची पिढी शिकण्यास जेथे
मस्त परदेशात आपणही करावी मौज तेथे
मात्र अपुल्या संस्कृतीचे ज्ञान संतत पाजळावे
थोर होती फार पूर्वी ठासुनी हे ऐकवावे
तुच्छ पाश्चात्त्यांस लेखावे असा सिद्धांत ठेवा
वापरा विज्ञान त्यांचे गर्व अपुला बाळगावा
दाखले बखरी पुराणांतील फसवे दाखवावे
कर्णकर्कश भाषणांसह ढोलताशे वाजवावे
शांतता सौजन्य असले बेरकी कावे असावे
वाद हरण्याच्या क्षणाआधीच कावेबाज व्हावे
शेवटी पर्याय म्हणुनी आठवावी थोर नावे
फेकताना चिखल अपुल्या अंतरी ना डोकवावे
काढुनी अंती गळा अन् भूतकाळास्तव रडावे
काढुनी अंती गळा अन् भूतकाळास्तव रडावे
- निलेश पंडित
२१ जून २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा