लयाला जाण्याचं
वेदना संपण्याचं
भाग्य असलेली
क्वचित डोळ्यांतून वाहणारी
कधी फक्त डोळ्यांत लुकलुकणारी
कधी कोकिळेच्या स्वरात लपलेली
तर कधी एखाद्या
"कोयलिया ना बोले डार" मधून
हृदयाला भिडून हवीहवीशी वाटणारी
कधी गाडीच्या खिडकीच्या काचेतून
याचना करणाऱ्या चिमुकल्या हातामागे
निस्तेज नजरेत साकळलेली
तर कधी हंबरणाऱ्या
गायीच्या डोळ्यांत
किंवा भुकेल्या पिलाच्या
"आई" ह्या हाकेत
दाटून आलेली
कारुण्यातून उमललेली जाणीव
नेमकी तशीच आता स्पर्शून जाते
गांजलेल्या आशाळभूत जनतेच्या
भाबडेपणाने
बदलासाठी केलेल्या आक्रोशातून
कधी अकाली जल्लोषातूनही
जेव्हा येतो
मर्ढेकरांनी वर्तवलेला
"महात्मा पुढचा"
फरक एकच …
वेदना संपण्याचं भाग्य
हिच्या कपाळी
नसेल कदाचित
- निलेश पंडित
९ जून २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा