हा ब्लॉग शोधा

शनिवार, १८ जुलै, २०१५

विवर


खोल काही
काही उथळ
काही खूप खूप खोल

एखादा निद्रिस्त एखादा मृत
ज्वालामुखी
कुठे उल्कापातातून
कुठे भूगर्भातल्या
अनाकलनीय
उलथापालथीतून
शुष्क काही
मौसमी आर्द्र काही
काही निव्वळ नावापुरता
ओलावा … आणि त्या ओलाव्यातही
अंतर्बाह्य शेवाळ - बुरशी वागवत
काही तुडुंब जलाशय
काही वैराण
काही पोटाशी घेऊन हिरवाई

काही भयाण शांत
सतत पालापाचोळ्याचा आवाज कुठे
कुठे घुमणारा अज्ञात हुंकार
कुठे दबलेल्या - संपलेल्या किंकाळ्या

पण अखेर प्रत्येक
… अक्षरशः प्रत्येक
फक्त एक विवर
पोसून प्रकाशाचं साम्राज्य वरवर
आत किर्र अंधाराचा वावर
रोज ... दिवसाउजेडी
अवतीभवती



- निलेश पंडित
१८ जुलै २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा