(वृत्त: लवंगलता)
जगापासुनी पळून जावे असे वाटते जेव्हा
नसते कारण वा तर्काचे सूत्र सुसंगत तेव्हा
शांत मनाला ना रुचणारे अवचित घडता काही
अनोळखी भासतो जरा मी मलाच उमगत नाही
चिडचिडतो कुढतो होतो अगतिकही अंतर्यामी
मग गोंजारत कुरवाळत बसतो माझ्याच व्यथा मी
शब्दांच्या भांडाराचाही करतो वापर गैर
मुखावरी औदार्य ठेवुनी पोसत जातो वैर
रूप माणसापरी मात्र अंतरी पशूचा अंश
मानवतेच्या वेषामध्ये दानवतेचा वंश
इतरांनी नमते घेता मी हरखत जातो आत
धुमसत बसतो घुसमटतो होता माझ्यावर मात
अलिप्ततेने नंतर बघता गवसे ह्यातिल गूज
विवेकावरी कसलीशी असते चढलेली सूज
असल्या ह्या युद्धात जिंकता मीच जरासा हरतो
मिळता गिळता मात त्यातुनी अधिक पक्व मी बनतो
- निलेश पंडित
१५ ऑगस्ट २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा