हा ब्लॉग शोधा

सोमवार, २४ ऑगस्ट, २०१५

साकल्य

आमचा अभिमान आता एवढा जाज्वल्य आहे
वेगळेपण ज्ञान जिज्ञासा इथे दौर्बल्य आहे

तीच ती मी काय सांगू गोष्ट मध्यमवर्गियांची
विफलता टाळून जगणे ह्यातही साफल्य आहे

हासलो मी काल वेडा वृद्ध कोणी नाचताना
मात्र मी नाचू नये ह्याचे जरा वैफल्य आहे

सत्य काही का असेना आपला संकल्प मोठा
एकदा हे मानता राखेतही मांगल्य आहे

मांडला बाजार आहे कैक लोकांनी कलांचा
फक्त आस्वादक रहावे हे खरे कौशल्य आहे

सर्व जगणे विखुरले आहे जरी तुकड्यांत माझे
शायरीने जोडल्याने त्यातही साकल्य आहे

- निलेश पंडित
२४ आॅगस्ट २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा