कोट्यावधी वर्षे न झिजता
काळावर मात करून टिकलेल्या
चिरंतन अजरामर तत्वांच्या
तथाकथित क्षणिक दैनंदिन प्रगतीवर
सातत्याने होणा-या
लाजिरवाण्या पण खात्रीदायक
विजयाचा हा टप्पाच ....
की निश्चयाने
वापरता येतं
सूज्ञ सुजाण विजेत्यांना आता
(अभिमान वृथाच असतो
हे पुन्हा पुन्हा सिद्ध करून)
तर्क विश्लेषण चिकित्सा
ह्या आणि अशा
भाकड तर्कहीन
क्षणभंगूर अल्पजीवी
मनुष्यमात्राच्या
आदिम शुद्ध चिरंतन प्रवृत्तींना
निरर्थक आव्हान देणा-या
क्षुद्र प्रवाहांना
वेळीच आटवून
आळा घालून
मानवाच्या मूर्ख आधुनिकतेची
उतरवण्यास झूल
खुद्द नियतीने दिलेलं
वैज्ञानिक तर्कशुद्ध
कसोट्या चाचण्यांमधून
तावून सुलाखून तयार झालेलं
खात्रीदायक
... भारतीय वा पाश्चात्त्य
सहा किंवा आठ बारी
पिस्तूल
ओंकारेश्वर धारवाड पासून
भविष्यातल्या आदिमानवाच्या
नव्याने बांधकाम चालू असलेल्या
अद्ययावत् शहरा गावांपर्यंत
कुठेही
कधीही
- निलेश पंडित
३ सप्टेंबर २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा