हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०१५

मी

(वृत्त: कालगंगा)

पाहिला 'मी' मीच डोकावून माझ्या आतला
अन् कळेना कोण नटवा कोणता सत्यातला

सर्व मीपण टाकण्याची वेळ येता समजले
मीच मजला फसवण्याचा घाट होता घातला

वाढत्या वेगातल्या होतो नशेने चूर मी
भान येता शेवटाशी काळ होता पातला

विस्तवाने ज्या अकाली पेटली माझी चिता
वाटला होता कधीकाळी मला यज्ञातला

ठेवले डोळे कसोशीने सदा मी कोरडे
सारखा पण अंतरी पाऊस होता मातला

शब्द वारेमाप गेलो नेहमी उधळीत मी
आज कळतो अर्थ सगळा नेमका मौनातला


- निलेश पंडित
१८ सप्टेंबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा