हा ब्लॉग शोधा

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०१५

डोंगरमाथा


क्षणोक्षणी जुने क्षण लावतात पिसे
होत जाताना गडद भूतकाळाचे सावट
गुंते सूक्ष्म जाणिवेत चित्त इवलेसे

पुसटशा आठवांची अलौकिक ओढ
करताना थोडी ढिली पकड वर्तमानाची
शुष्कतेची आर्द्रतेशी चढाओढ गूढ

आठवतो काळ एक होता जो असाही
माध्यान्हीचे तेजःपुंज सूर्यास्ताचे स्वर्णवर्खी
स्वप्न होते पुढे फक्त मुक्त दिशा दाही

वारे उलटे सुलटे वाहिले वेगात
कळले न पार केला कधी मी डोंगरमाथा
लागलोही उताराला अज्ञात ओघात

असे नव्हे झाले गेले नव्हते पसंत
रंगी रंगलो रंगांच्या न्हालो नशेत मोहांच्या
नकळत घडल्याची फक्त थोडी खंत

म्हणूनच उकरतो पुन्हा भूतकाळ
हात रक्ताळले तरी खरवडत राहतो
उरल्यासुरल्यासाठी खडकाळ माळ

अवचित मात्र कधी येते ताजी ग्वाही
पल्ला जरी छोटा तरी दडलेला त्यात कुठे
डोंगरमाथा एखादा असेल पुढेही


- निलेश पंडित
१ नोव्हेंबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा