हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०१५

व्यर्थ

(वृत्त: पतीतपावन)

अंधाराच्या गडदपणाचा व्यर्थ उहापोह
दिवाभिताला प्रकाशतेचा ना वाटे मोह
…. व्याप्ती मोठ्या सरोवराची असो लक्ष्यवेधी
अंतर्यामी खोल कुणी रमतो साधा डोह

विषवल्लीचा रस अमृतधारा वाटे कोणा
सृजनशील पोसत जातो अनुभूतीच्या वेणा
…. भीषण संहारात उमलते कलाकृती थोर
कुणी राखते दिव्यत्वातच विझण्याचा बाणा

सूत्रांचा अभिशाप ग्रासतो सुज्ञ मनालाही
तमकेंद्री मन विरघळते हरवून दिशा दाही
…. सकल विकलता अटळ असा घालत जाते विळखा
गूढ पोकळी नित्य लाभता आणि टोचताही

अशक्य ही पोकळी टाळणे कधी न ही टळते
क्षण आनंदाचे दुःखाचे सरून साकळते
…. एकटेपणा माझा … केवळ माझा … जाणवतो
पुन्हा नव्याने अस्तित्वाचे रहस्य आकळते


- निलेश पंडित
१७ ऑक्टोबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा