हा ब्लॉग शोधा

रविवार, १२ जून, २०१६

खेळ

(वृत्त: सुमंदारमाला)

बसे रंगुनी फक्त स्वप्नात जो त्या जिवाला खरे ते कळावे कसे
भले दृश्य आहे जरी स्पष्ट मृत्यू तया मोक्ष मुक्ती म्हणावे कसे
... दिसेना कुठे मार्ग स्थित्यंतराचा तरी भाबडी घट्ट आशा उरी
स्वये कल्पिले दैव जे गूढ माया तयाने कुणी मोहरावे कसे

तसा ठाम बांधील राही विवेकास तर्कास कोणी सदा सर्वदा
जरी मार्ग सारा अपूर्णातला, तोकडा, शुष्क भासे-असे कैकदा
.... असंभाव्य संभाव्य साकल्य चोखाळतो नेहमी जो चिकित्सेतुनी
तया का कळे ना उणीवेत साऱ्या वृथा जाणिवांची सरे संपदा

उरी बाणवोनी अशी गाढ निष्ठा भले चालती मार्ग आपापला
जरी पाहती भूतकाळातले पंथ ना हा ... न तोही कधी संपला
.... जणू त्यात हेही पुरेसे नसावे तसे भांडती एकमेकांसवे
अमर्याद त्यातून साचे असा गर्व मेंदू जयाने असे व्यापला

घडे रोज संघर्ष शोधावया स्थान विश्वातले आपले नेमके
अहंकार सांभाळुनी सुप्त जो तो असे खेळ खेळे छुपे बेरके


- निलेश पंडित
१२ जून २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा