हा ब्लॉग शोधा

शनिवार, १८ जून, २०१६

वल्गना


तर्कविवेकावरच्या साऱ्या
संपतील भाकडशा श्रद्धा
लयास जाईल वादही मग
उत्क्रांतीचा अर्धामुर्धा

केवळ सत्याला जपण्यास्तव
असत्यभाषण संतत थोडे
तत्व अहिंसेचेच रुजवण्या
दामटणे हिंसेचे घोडे

अधर्मात वसलेला असला
स्वभाव सध्या धर्म राखतो
अवघ्या जगताच्या प्रगतीचा
अधोगतीतुनि मार्ग आखतो

उत्क्रांतीचा पुढील टप्पा
बघा कसा येतो उफराटा
उजेडात अंधारानंतर
संपतील बुद्धीच्या वाटा

अजिंक्य शक्ती उरेल केवळ
आणि कलेवर उत्क्रांतीचे
हिंस्त्र श्वापदांनीच लिहावे
पाठ अहिंसा अन् शांतीचे

अंधाराचा अंधाराशी
उजेडात हा असा सामना
सुबुद्धतेच्या संध्यासमयी
तेजाच्या का वृथा वल्गना


- निलेश पंडित
१९ जून २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा