आढळते इतिहासामध्ये प्रतिबिंब
भवितव्याचे जे वाटे धूसर गूढ
रममाण भाबड्या आशास्वप्नांमध्ये
चेहरे उजळ पण अंतरातुनी मूढ
वर देता कोणी नवीन प्रकाशकिरणे
कवळती नेहमी केवळ अंधाराला
खितपत जगती चिखलात रुतवुनी पाय
मिरविती मनांवर सुखशब्दांच्या माला
जाणती तसे ते नवे मार्ग ज्ञानाचे
नवविश्वाची घेतीही थोडी प्रचिती
पण अंतरातला ढळू न देती बाणा
जपती विश्वासाची अद्भुतशी नीती
मी त्रयस्थ स्तंभित कुठे अंतरावरती
तळमळतो अन् करतो थोडा त्रागाही
ना कधी सत्य मी समजू शकलो ... शकतो
अनुभवतो केवळ ह्रदय-मनाची लाही
क्षण येतो विरळा परी नेमका केव्हा
ढवळून मनाला स्पष्ट सांगतो काही
मी बेसावध टाळण्यास तो धडपडतो
तो अटळ मला देतसे नेमकी ग्वाही
"जग वेगवेगळे विशिष्ट प्रत्येकाचे
आयुर्मानाचा अल्प त्यातला पल्ला
वल्गना विसर वैचारिकतेच्या साऱ्या
भावनाच अंती करते तिजवर हल्ला"
- निलेश पंडित
२६ जून २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा