आवाजाची ठेव भले ना मला लाभली
गुणीजनांचे सुमधुर स्वर तर
सदैव कानी अनंत पडले!
काळ्याकरड़्याशा रंगाच्या चौकटीतही
आयुष्याच्या अवतीभवती
शतरंगांचे दर्शन घडले!
वनराई, खडकाळ जमीनी, अमर्याद नभ
शेते हिरवी, तरंगते ढग
... कशाकशाने मन चाळवले
प्रवाहातला एक थेंब मी कोसळणारा
किरण मला जे लाभत गेले
ते ते अंगावर खेळवले
अपूर्णता ... पोकळी टाळणे अशक्य केवळ
जे नाही ते दत्तक घ्यावे
ये मृत्यो घेईन तुलाही
सीमित जगण्याला द्यावी मी तुझीच महिरप
तमात होताना विलीन मी
सुखे पहावी नवी उषाही
- निलेश पंडित
३ जुलै २०१६
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा